इंदिरा गांधी भाषण मराठी | इंदिरा गांधी मराठी माहिती | इंदिरा गांधी निबंध मराठी
(१९ नोव्हेंबर १९१७ ते ३१ ऑक्टोबर १९८४)
इंदिरा गांधी भाषण मराठी | इंदिरा गांधी मराठी माहिती | इंदिरा गांधी निबंध मराठी
" कणाकणाने ज्योत जळाली,उजळीत तेजोधन.जगास द्याया शितल लेपन
झिजले हे चंदन. " मला कोणी केव्हाही विचारलं, तुझा आवडता पंतप्रधान कोण ? तर मी क्षणाचाही विलंब न लावता सांगेन, 'इंदिराजी गांधी!' होय, भारतासारख्या खंडप्राय देशाच्या दीर्घकाळ पंतप्रधान राहिलेल्या त्या एकमेव नेता होत्या. स्वातंत्र्य चळवळीत झोकून देणारी आणि देश स्वतंत्र झाल्यावर त्याच्या विकासासाठी अविरत झटणारी त्यांच्यासारखी स्त्री पंतप्रधान तर शोधूनही मिळायची नाही.
१९ नोव्हेंबर १९१७ रोजी अलाहाबाद येथे त्यांचा जन्म झाला. आई कमला आणि वडिल पंडीत जवाहलाल नेहरू यांच्याकडून विविध उत्तम गोष्टींचं
बाळकडू त्यांना जन्मत:च मिळालं. 'आनंद भवन' या वास्तूत त्यांच्या जन्मानं एक चैतन्य पसरलं. स्वातंत्र्य आंदोलनातील नेते मोतीलालजी नेहरु, त्यांच्या पत्नी स्वरूपाराणी या आजी आजोबांना पण खूपच आनंद झाला. इंदिराजीना 'इंदिरा' हे नाव आजी-आजोबांकडून मिळालं होतं. तर नेहरू त्यांना 'प्रियदर्शिनी' म्हणून बोलवायचे.
लहानपणापासूनच 'स्वदेशी' आणि 'स्वदेश' यांचं प्रेम त्यांच्या मनात निर्माण झालं होतं. एकदा त्यांच्याकडे विलायतेहून आलेल्या पाहुण्यांनी एक सुंदर गुलाबी फ्रॉक त्यांना आणला होता. पण तो फ्रॉक आपल्या खोलीच्या कोपऱ्यात ठेऊन त्याच्याकडे त्या एकटक पाहत बसल्या. आईनी फ्रॉक घालायचा आग्रह केला तेव्हा, 'मी विदेशी कपडे परिधान करणार नाही!' असं ठासून त्यांनी आईला सांगितलं. आपली विदेशी खेळणी, कपडे पण त्यांनी विदेशी कपड्यांच्या होळीत टाकून दिली.
वयाच्या तेराव्या वर्षी म्हणजे १९३० साली त्यांनी आपल्या सवंगड्याची वानरसेना स्थापन करून नेत्यांचे संदेश पोहचवण्याची कामे केली. ब्रिटीशांच्या विरोधात मिरवणूका काढल्या, घोषणा दिल्या. या सर्वाच्या बरोबरीने शिक्षणही चालूच ठेवले. प्रारंभी अलाहाबाद, मग पुणे आणि नंतर रवींद्रनाथांच्या शांतिनिकेतनमध्ये त्यांनी शिक्षण घेतले. शांतिनिकेतनातल्या मुक्त वातावरणात त्या विशाल बनल्या. कष्ट, स्वावलंबनाच्या जोरावर त्यांनी विविध कलाही आत्मसात केल्या. नृत्याच्या कलेतील त्यांच्या यशाचं तर खुद्द रवींद्रनाथ टागोरांनी पण कौतुक केलं होतं. शांतिनिकेतनच्या कलापथकातून भारत भ्रमण करायला त्या उत्सुक होत्या, पण त्यांच्या आईच्या सुश्रुषेसाठी त्यांना स्वित्झर्लंडला जावं लागलं आणि त्यांची भारतभ्रमणाची संधी हुकली.
स्वातंत्र्य आंदोलनांतील प्रमुख नेते असल्यामुळे वडील बऱ्याचदा तुरुंगात असायचे. आईचे आजारपण तर बळावतच चालले होते. पण त्याही कठीण प्रसंगात त्या ठाम उभ्या राहिल्या. पण २८ फेब्रुवारी १९३६ रोजी कमलाजींचे निधन झाले आणि त्यांच्यावर खूप मोठा आघात झाला. वडिलांनी त्यांना पुन्हा शांतिनिकेतनमध्ये घालण्याचा प्रयत्न केला पण फिरोझ गांधी या नेहरू घराण्यातील परिचित असलेल्या हुषार अन् उमद्या तरुणाच्या सांगण्यावरून त्यांना 'ऑक्सफर्ड' मध्ये दाखल करण्यात आलं.
या काळात पंडितजीनी इंदिराजींना जी पत्रं पाठवली त्याद्वारे त्यांना संबंध भारताच्या इतिहासाची पुरेपूर जाणीव झाली. याच काळात हिटलरने इंग्लंडवर हल्ले चढवायला प्रारंभ केला. वातावरण चिघळत चाललं, म्हणून विमानाने एकट्या इंदिराजी भारतात परत आल्या. त्यांच्या साहसाचं साऱ्यांनी कौतुक केलं. मागोमाग फिरोझ गांधीही भारतात आले आणि येथील राजकारणात सक्रीय झाले. विजयालक्ष्मी आणि कृष्णा या आत्यांचा विरोध असतानाही इंदिराजींचा २६ फेब्रुवारी १९४२ रोजी फिरोज गांधी यांच्याशी आंतरजातीय विवाह झाला.
फिरोज गांधी आणि इंदिरा यांनी या देशाच्या चळवळीत मोठं योगदान दिलं. एका मिरवणूकीत ब्रिटीश सोजिरांनी महाविद्यालयीन विद्यार्थ्यावर लाठीमार केला. पण त्यात अग्रभागी इंदिराजीही होत्या. त्यांनाही मार लागला पण त्यांनी तिरंगा सोडला नाही. तो खाली पडू दिला नाही. उलट स्त्रियांवर लाठीमार करणाऱ्या त्या अधिकाऱ्याला त्या म्हणाल्या " मै नेहरूजीकी कन्या हूँ, मै डरूंगी नहीं चिल्लाऊँगी नहीं, तिरंगा झंडा छोडूंगी नहीं।" अशा अनेक शौर्याच्या गोष्टी सांगता येतील.
राजीव आणि संजीव या दोन देखण्या मुलांना वाढवत त्यांनी एकीकडे संसाराचा गाडा ओढला. १९५९ साली त्या काँग्रेसच्या अध्यक्ष म्हणून निवडल्या गेल्या. त्यांनी प्रचंड कामं केली. संघटन मजबूत केलं. १९६० ला पतीनिधन १९६४ ला पंडितजींचं निधन झालं. आघातावर आघात होत असतानाही त्या खंबीरपणे उभ्या राहिल्या. लालबहादूर शास्त्रींच्या मंत्रिमंडळात त्यांनी नभोवाणी मंत्र्याचा कारभार नेटकेपणाने सांभाळला आणि शास्त्रीजींच्या मृत्यूनंतर या देशाच्या पंतप्रधान म्हणून त्यांनी मोठी भूमिका बजावली.
सोनार बांगलाची निर्मिती, बँकांचे राष्ट्रीयीकरण, वीस कलमी कार्यक्रमाची अंमलबजावणी, वैज्ञानिक प्रगती, अणुशक्तींचा शांतीसाठी उपयोग, कला, उद्योग, संस्कृती या क्षेत्रातील नेत्रदीपक यशात त्यांचा मोठा वाटा आहे.
३० ऑक्टोबर १९८४ रोजी त्यांनी केलेल्या एका भाषणात त्या म्हणाल्या होत्या, "माझ्या देशाची सेवा करताना मला मृत्यू आला तर मला त्याचा अभिमानच वाटेल. माझ्या रक्ताचा थेंब अन् थेंब मी या देशाच्या वैभवासाठी आणि विकासाठी खर्च करीन आणि हा देश बलवान आणि चैतन्यदायी बनवेन."
३१ ऑक्टोबर १९८४ रोजी सकाळी काळाने त्यांच्यावर क्रूर हल्ला केला. त्यांच्याच अंगरक्षकानं त्यांच्यावर गोळ्यांचा वर्षाव करून त्यांना मारलं. एक थोर, साहसी स्त्री, अखेर हुतात्मा झाली. पहिले गांधी प्रार्थनेच्या वेळी गेले. या दुसऱ्या गांधी देशसेवेसाठी बाहेर पडताना गेल्या. हेच या देशाचं दुर्दैव होय. एक तेज:पुंज व्यक्तिमत्त्व लोप पावलं. सारा भारत सुन्न झाला. जग या घटनेनं अचंबित झालं. त्या गेल्या पण त्यांचं उत्तुंग व्यक्तिमत्त्व आजही भारतीयांच्या मनावर कोरलं गेलं आहे. त्यांच्या स्मृतीला माझे शतशः प्रणाम !
इंदिरा गांधी भाषण मराठी | इंदिरा गांधी मराठी माहिती | इंदिरा गांधी निबंध मराठी
- indira gandhi speech in marathi
- gandhi speech in marathi
- indira gandhi speech in hindi
- indira gandhi marathi nibandh
- indira gandhi in marathi information
- इंदिरा गांधी भाषण मराठी
- इंदिरा गांधी निबंध मराठी
- इंदिरा गांधी मराठी माहिती
Tags:
Marathi